वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इलॉन मस्क यांच्यावर त्यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. अमेरिकेत सध्या त्यांना ट्रम्प यांचा उजवा हात असेही म्हटले जात आहे आणि यावरून ट्रम्प प्रशासनात मतभेदही निर्माण होऊ लागले आहेत. त्यातच आता व्हाइट हाउसमध्ये एका उच्चस्तरीय बैठकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच मस्क आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यात वाद होण्याची घटना घडली आहे. सत्तेत आल्यापासून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सतत कठोर निर्णय घेत आहेत. असाच एक निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये कपात करणे वादाचा विषय ठरत चालला आहे. अमेरिकन स्टेट एम्प्लॉईज ऑर्गनायझेशनसह अनेक लोकांनीही याला विरोध केला आहे. आता या निर्णयामुळे इलॉन मस्क आणि परराष्ट्र मंत्री यांच्यात वाद झाला. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी अर्थात डॉजचे प्रमुख मस्क हे ट्रम्प प्रशासनाच्या खर्च कपातीचे मोठे समर्थक आहेत. यावरूनच त्यांनी रूबीयोंशी भांडण केले. मस्क यांचा आरोप आहे की रुबियो यांनी त्यांच्या विभागात पुरेशी कपात केलेली नाही. चर्चेदरम्यान मस्क यांनी परराष्ट्रमंत्र्यांवर टीका केली आणि म्हणाले की, तुम्ही कोणालाही काढून टाकलेले नाही आणि तुमचे खाते अनावश्यक एवढे मोठे आहे. यानंतर, रुबियो यांनीही मस्क यांना प्रत्युत्तर दिले आणि म्हटले की त्यांच्या विभागातील १५०० कर्मचाऱ्यांनी आधीच स्वतःहून निवृत्ती घेतली आहे. कोणाला दिखाव्यासाठी परत काढता यावे म्हणून त्यांना पुन्हा नोकरीवर घ्यायचे का अशी उपहासात्मक विचारणाही रूबीयोंनी मस्क यांना केली. दोघांमधील वाद वाढल्यानंतर ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना पाठिंबा देताना ट्रम्प म्हणाले की, रुबियो चांगले काम करत आहेत आणि त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे. याद्वारे ट्रम्प यांनी मस्क यांना आक्रमक धोरणे स्वीकारू नयेत असे संकेतही दिले. जेव्हा ट्रम्प यांनी नंतर पत्रकार परिषदेत भाषण केले आणि त्यांना दोन्ही नेत्यांबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की असा कोणताही संघर्ष झाला नाही, मी तिथे होतो. ट्रम्प पुढे म्हणाले की, मस्क आणि रुबियो दोघेही एकत्र खूप चांगले काम करतात. ट्रम्प यांनी असेही म्हटले की रुबियो परराष्ट्र सचिव म्हणून उत्तम काम करत आहेत आणि मस्क स्वतः एक अद्वितीय व्यक्ती आहेत आणि ते देशासाठी उत्तम काम करत आहेत.