Murlidhar Mohol : खडकवासला ते हिंजवडी मेट्रो मार्ग; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिल्या प्रकल्प आराखडा तयार करण्याच्या सूचना

Murlidhar Mohol : लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रोने जोडला जाणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात होते. सहा विविध मार्गांवर चर्चा होऊन त्यातील व्यावहारिक मार्ग अंतिम करण्यात आला आहे. त्यामुळे आता विमानतळ थेट मेट्रो मार्गाने जोडले जाईल, अशी माहिती खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. त्याचबरोबर खडकवासला ते हिंजवडी या मेट्रो मार्गासाठी विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.
शहर आणि परिसरातील विविध विकासकामे आणि प्रकल्पांसंदर्भात मोहोळ यांनी नुकतीच प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. या वेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक श्रावण हर्डीकर, लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके, हवाई दलाचे अधिकारी, तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणासाठी विमानतळाभोवती पर्यायी रस्ता तयार करण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाल्याचे मोहोळ यांनी सांगितले. नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाचाही आढावा घेत काम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना मोहोळ यांनी दिल्या. समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतिम टप्प्यात उर्वरित साठवणूक टाक्यांचे व जलवाहिन्यांचे, तसेच मीटर बसविण्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषणात वाढ झाली आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, तसेच शहरातील पदपथ अतिक्रमण मुक्त केले जावेत. महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत आणि वसतिगृह इमारतीच्या सद्यस्थितीचा आढावा घेत हे कामही निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश मोहोळ यांनी दिले.
– वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचे काम लवकरच सुरू होणार
– हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम ९४ टक्के पूर्ण
– या मार्गावरील २३ पैकी १३ स्टेशनचे काम एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन
– येरवडा कारागृह ते विमानतळ आणि कल्याणीनगर ते विमानतळ या रस्त्यांच्या विस्तारीकरणाला लवकरच सुरुवात





