Murlidhar Mohol : “राजकारणापलीकडचा माणूस हरपला!”; भरल्या डोळ्यांनी मोहोळांनी सांगितला अजितदादांसोबतचा ‘तो’ अनुभव
Murlidhar Mohol : दादांशिवाय पुण्याची कल्पनाच करवत नाही; चार दशकांचा वारसा अशा भीषण अपघातात संपल्याने केंद्रीय मंत्री मोहोळ भावूक.

Murlidhar Mohol – महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा…अशाप्रकारे अनपेक्षित जातील असे स्वप्नातही वाटत नाही. हा माझ्यासाठी मोठा धक्का असून, ते नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील समाजकारणाचे, राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. पवार कुटुंबीयावरील हा मोठा आघात आहे. अजितदादांशिवाय जिल्ह्यासह महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण अपूर्णच राहील,
अशी भावना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी मोहोळांना अश्रू अनवार झाले.प्रशासनावर पकड असलेले जनप्रतिनिधी, कणखर आणि खंबीर नेतृत्व, मार्गदर्शक आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजित पवार यांनी गेली चार दशके महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची ओळख निर्माण केली. कोविडच्या संकटकाळात अडीच वर्षे शहराचा पालक म्हणून सांभाळ केला.
माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांचा सहवास लाभला. राजकारणापलीकडचे आमचे संबध असून, त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या विविध पैलूंचा अनुभव आला. दादांशिवाय राज्याचे, पुण्याचे राजकारण, समाजकारण ही कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोजकेच नेते, हे सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करत होते. त्यातील दादा एक आहेत. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसह सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांवर मोठा आघात आहे.





