Success Story: डिटर्जेंट विकून कमावली हजारों कोटींची संपत्ती; जाणून घ्या यूपीतील सर्वात श्रीमंत व्यक्तीविषयी

Success Story: उत्तर प्रदेश हे भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. पण यूपीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला मुरलीधर ज्ञानचंदानी यांच्या यशोगाथेची ओळख करून देणार आहोत. कानपूरचे रहिवासी मुरलीधर हे उत्तर प्रदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती तब्बल १२,००० कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, मुरलीधर हे ‘घडी डिटर्जेंट’ बनवणाऱ्या प्रसिद्ध कंपनीचे मालक आहेत.
कोण आहेत मुरलीधर ज्ञानचंदानी?
मुरलीधर ज्ञानचंदानी हे एक यशस्वी उद्योजक आहेत. ते ‘रोहित सर्फॅक्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ (आरएसपीएल) ग्रुपचे मालक आणि चेअरमन आहेत. आरएसपीएल ही एफएमसीजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी घडी डिटर्जेंट पावडर, साबण यांच्यासह फुटवेअर आणि डेअरी क्षेत्रातही कार्यरत आहे. फुटवेअरमध्ये कंपनीचा ‘रेड चीफ’ हा लोकप्रिय ब्रँड आहे.
पित्याकडून मिळाली प्रेरणा
डिटर्जेंट आणि साबणाचा हा व्यवसाय मुरलीधर यांचे वडील दयालदास ज्ञानचंदानी यांनी सुरू केला होता. दयालदास ग्लिसरीनपासून तेल साबण आणि डिटर्जेंट बनवायचे. मुरलीधर यांनी ही परंपरा पुढे नेली आणि आज हा व्यवसाय ‘घडी’ या मोठ्या ब्रँडमध्ये रूपांतरित झाला आहे, जो आरएसपीएल ग्रुपचा हिस्सा आहे.
भाऊही आहे यूपीतील दुसरा श्रीमंत
यूपीतील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती कोण, तर मुरलीधर यांचे भाऊ बिमल ज्ञानचंदानी! बिमल यांची संपत्ती १०,५०० कोटी रुपये आहे. या बंधूंनी मेहनत आणि दूरदृष्टीने आपल्या व्यवसायाला नव्या उंचीवर नेले आहे.





