पिंपरी : मित्राच्या भावाला मारहाण केल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर दोघांनी पेपर कटरने वार करत दगडाने मारहाण केली. त्याला गंभीर जखमी करुन त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. ६) रात्री सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात घडली.
याप्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपी नागेश मोहनराव लांडगे (वय २२, रा. मधुबन कॉलनी लेन नं. २, सांगवी) आणि बॉलर ऊर्फ किरण प्रभाकर गायकवाड (वय २३, रा. रोकडे निवास, प्रभातनगर गल्ली नं. २, पिंपळे गुरव) यांना अटक केली आहे.
याबाबत सागर अनिल शर्मा (वय २२, रा. वैदुवस्ती, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मित्र सचिन सुर्यवंशी यांच्या भावाला मारहाण करणाऱ्या आरोपींना त्याबाबत विचारणा करण्यासाठी फिर्यादी गेले होते. त्यामुळे तु आमच्याशी मोठ्या आवाजात का बोलतोस असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. या गुन्ह्याच्या पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक आकमवाड करत आहेत.