युजीन – भारताचा लांब उडी क्रीडाप्रकारातील नवोदित स्टार खेळाडू मुरली श्रीशंकर याला येथे सुरु असलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला. या फेरीत प्रवेश करणारा भारताचा पहिलाच पुरुष खेळाडू ठरलेल्या मुलरीला अंतिम फेरीत चमक दाखवता आली नाही व तो सातव्या स्थानी राहिला. या स्पर्धेच्या पात्रता फेरीत त्याने जी कामगिरी केली होती, ती देखील त्याला अंतिम फेरीत करता आली नाही.
मुरलीने या स्पर्धेच्या पात्रता फेरीत चक्क 8 मीटर अंतर नोंदवले होते. मात्र, अंतिम फेरीत त्याला 7.96 मीटरचेच अंतर नोदवण्यात यश आले. आजवरच्या कारकीर्दीत मुरलीने 8.36 मीटर अंतराची नोंद करत सर्वोत्तम कामगिरी केली होती. या स्पर्धेत मात्र, त्याला साफ अपयशाचा सामना करावा लागला. यापूर्वी त्याला जपानमध्ये जालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही अशाच अपयशाचा सामना करावा लागला होता.
अमेरिकेतील युजीन येथे सुरु असलेल्या ह्या स्पर्धेत चीनच्या जियानान वॅंग याने 8.36 मीटरच्या उडी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली. ग्रीसच्या मिल्टादीस टेंतोग्लू याने रजत पदकावर समाधान मानले. सायमन एहॅमर याने ब्रॉंझपदक मिळवले. मुळचा केरळचा असलेल्या मुरली या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.
या स्पर्धेद्वारे त्याला आगामी राष्ट्रकुल स्पर्धेसाठीचा सराव करत पदक जिंकायचे होते. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. श्रीशंकरला अखेरच्या प्रयत्नात 8.16 मीटरची नोंद करणे गरजेचे होते मात्र, त्याला 7.83 मीटरचीच नोंद करता आली. या फेरीत पहिल्या प्रयत्नात त्याने 7.96 मीटर उडी मारली. त्यानंतर त्याने दोन प्रयत्न फाऊल ठरले.