World Athletics Championships : जेस्वीन अल्ड्रीन ठरला पात्र, मुरली श्रीशंकर मात्र अपयशी
Updated On:

बुडापेस्ट :- भारताचा लांब उडी क्रीडा प्रकारातील अव्वल खेळाडू जेस्वीन अल्ड्रीन याने ऐतिहासिक कामगिरी करताना येथे सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताचा मुरली श्रीशंकरला मात्र अपयशाचा सामना करावा लागला.
जेस्वीन हा राष्ट्रीय विक्रमवीर असून, त्याच्याकडून बुधवारीही अशाच कामगिरीची अपेक्षा होती. त्याने पहिल्या प्रयत्नात 8 मीटरचे अंतर नोंदवले. त्यानंतर मात्र दोन्ही प्रयत्नात त्याच्याकडून फाऊल झाले. मात्र, पहिला प्रयत्नच त्याचा यशस्वी ठरला असल्याने तो अंतिम 12 खेळाडूंमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.
आता ही अंतिम फेरी गुरुवारी होणार आहे. श्रीशंकरला मात्र 7.74 मीटर अंतरच गाठता आले. दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नात त्याने अनुक्रमे 7.66 व 6.70 मीटर अंतर नोंदवले. त्यामुळे त्याला अंतिम पात्रता मिळवता आली नाही.


