पुणे | अनधिकृत हाॅटेल्सवर पालिकेचा “जेसीबी’

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नागरिकांकडून तक्रारी झाल्यानंतरही कोरेगाव पार्क परिसरात अनेक अनधिकृत हाॅटेल सुरूच होती. अखेर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने या भागात कारवाई करत दहा अनधिकृतरित्या विकसित करण्यात आलेले हॉटेल्स आणि इतर बांधकामांवर कारवाई केली आहे.
या हाॅटेलला महापालिकेने २०२० मध्ये कारवाईच्या नोटीस बजावल्या होत्या. त्यानंतर काही हाॅटेल चालकांनी न्यायालयात धाव घेतली घेत कारवाईस स्थगिती मिळविली होती. तसेच त्यानंतर नव्याने बांधकामे केली होती.त्यामुळे महापालिकेने विधी विभागाचा अभिप्राय घेत नवीन बांधकामांना नोटीस बजावून अखेर कारवाई केली आहे.
या कारवाईत सुमारे ४६ हजार ५०० चौरसफूट बांधकाम काढून टाकण्यात आले. बांधकाम विकास विभाग झोन क्र. ४ कडून कारवाई करण्यात आली १३ सेवक १८ एमएसएफसेवक, २२ स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, १ जाॅ कटर, ६ जेसीबीच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.





