मनपाचा तिसऱ्या दिवशी अतिक्रमणांवर हातोडा; पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण

नगर – शहरात सुरु असलेले अतिक्रमण हटाव मोहिम सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. हे अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे यांनी पाहणी केली. सोमवार (दि.17) रोजी सकाळी एमजी रोड पासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर घास गल्ली, शहाजी रोड, नवी पेठ, तेलीखुंट, सर्जेपुरा, चितळे रोड, नेहरू मार्केट नंतर दिल्लीगेट परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.
ही कारवाई अर्जून जाधव, रिजवाण शेख, बाळासाहेब कोतकर, सुभाष झारेकर, दत्ता जाधव, विलास नरसाळे, सुरेश भुतकर, राहुल तनपुरे, अशोक रक्टे यांच्या पथकाने कारवाई केली. शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी येथील बाजारपेठेतील दोन व्यापार्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आला होतो. शनिवार (दि.15) व्यापाऱ्यांसह हिंदुत्वादी संघटनांनी आक्रमक होत अतिक्रमणे तत्काळ हटविण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेच मनपाकडून कारवाईची मोहिम सुरू करण्यात आली. ती तिसऱ्या दिवशी सोमवारी ही सुरू होती.
मनपा अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. कोतवाली, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जेसीबीने अतिक्रमण हटविण्यात येत होते. अतिक्रमणात येत असलेल्या हातगाड्या, टपऱ्या, बॅनर, प्लास्टिक व पत्र्यांचे शेड काढण्यात आले.





