नगरकरांच्या पाण्याला वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

नगर – महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा फटका शहरातील पाणी वितरणाला बसला आहे. शहरात अनेक ठिकाणची वीजपुरवठा खंडित झाला आहे. महापालिकेने वारंवार विनंती केल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र, सलग सात ते आठ तास वीज नसल्याने वसंत टेकडी व आरटीओ कार्यालयाच्या परिसरातील पाण्याच्या टाक्या भरता आल्या नाहीत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
बुधवारी (दि.4) रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागातील कोठला, मंगलगेट, झेंडीगेट, दाळमंडई, रामचंद्र खुंट, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर, गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको या भागाला पाणीपुरवठा करता आला नाही. या परिसरात उद्या गुरुवारी (दि.5) पाणीपुरवठा करण्यात येईल.
गुरुवारी पाणी वाटप होणाऱ्या लालटाकी, सर्जेपूरा, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदीबाजार, कापडबाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड, सावेडी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार असून येथे शुक्रवारी (दि.6) पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


