पुणे जिल्हा : आढळरावांकडून बेरजेचे समीकरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात लढ्यासाठी सज्ज : राजकीय संदर्भ बदलणार?
राजेंद्र वारघडे
पाबळ – केंद्रात व महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात सर्वच राजकीय पक्ष सहभागी असताना, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यानी राजकीय महत्वाकांक्षा लपवून न ठेवता आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. बेरजेच्या राजकारणातून समीकरणे जुळणार काय, याकडे संपूर्ण शिरूर मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.
महाराष्ट्रातील राजकीय सत्ता बदल होत असताना तत्कालीन उमेदवारी निश्चित करण्याच्या प्रयत्नात त्यांना मिळालेली अन्यायकारक वागणूक, पर्यायाने त्यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश, त्यानंतर सुरू केलेली राजकीय तयारी यातून निर्माण झालेली सहानुभूती ही आढळरावांना मदतीला येण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांचा गोंधळ ही त्यांना इष्टापत्ती ठरण्याची शक्यता आहे.
तीनवेळा खासदार असताना ज्वलंत प्रश्न, राजकीय विरोधक आणि निष्ठावंत कार्यकर्ते याची खडा न् खडा माहिती असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सतत कार्यमग्न राहून सर्वपक्षीय विरोध कमी करण्यासाठी आढळराव हे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकत असल्याची बाब वस्तुस्थितीला दुजोरा देत आहे.
अडीच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणाने कलाटणी घेतली आहे. शिंदे फडणवीस सरकार उदयास आले. शिवसेनेचे काही खासदारही शिवसेनेला सोडून गेले. याठिकाणी जे राहिले त्यातील एकनिष्ठ आढळराव यांना महत्व येण्याऐवजी राजकीय घडामोडीत बाजूला काढण्याचा झालेला प्रयत्न त्यांना शिंदे गटात प्रवेश करण्यास कारणीभूत ठरला आहे. हीच बाब त्यांच्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघ सुरक्षित करण्यात यशस्वी ठरली आहे.
महाविकास आघाडीत त्यांना काही कृती करणे हीच बाब अशक्य होती तर भाजपाचा पर्याय हा अखेरचा पर्याय ठरत होता. या पार्श्वभूमीवर त्यांना शिंदे गटात प्रवेश करावा लागल्याने भाजपचा ही पाठिंबा प्राप्त होणार आहे. नवा सहकारी पक्षही मिळाला आहे. यातून उद्या काही राजकीय स्थित्यंतर झाले तरीही त्यांच्यासाठी सर्वच वाटा सुरक्षित असणार आहेत. संभाव्य निवडणुकीला सामोरे जाताना, अपयशाला कारणीभूत ठरलेल्या गोष्टीचे निराकारण, जुने राजकीय मतभेद मिटवणे यात आघाडी घेऊन जनतेच्या मनात आपले स्थान अढळ करण्यात घेतलेली आघाडी त्यासाठी सहानुभूती निर्माण करीत असल्याची सर्वसामान्यात चर्चा आहे.
राजकीय घडामोडी, न्यायालयातील वाद आणि निवडणूक आयोगाचा निकाल हा भविष्यातील भाग आहे. मात्र, आढळराव यांनी जमा केलेला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच ही त्यांची सध्या जमेची मोठी बाजू आहे. हीच बाजू योग्य वेळ येताच आढळरावांना पुन्हा खासदार करण्यात मोठी भूमिका बजावणार काय,अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.





