पुणे | नांदेड सिटीला पालिकेचा दिलासा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नांदेड सिटी मधील निवासी मिळकतींना महापालिकेडून अखेर ४० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच आकारण्यात आलेला मिळकतकर टाऊनशिप कायद्याप्रमाणे ६६ टक्के सवलत देऊन ३४ टक्के दराने आकारण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
ज्या नागरिकांनी मागील वर्षी महापालिकेने दिलेल्या मुदतीत पीटी-३ अर्ज भरून दिले आहेत, त्यांनाच ही सवलत देण्यात आली असून सुधारीत बिले नागरिकांना पाठविण्यास सुरूवात झाली आहे.
महापालिकेकडून मागील वर्षी नांदेड सिटीमधील १२ हजार मिळकतींना मिळकतकर आकारण्यास सुरूवात करण्यात आली होती. त्यानुसार, महापालिकेने २०२१-२२ पासूनची बिले नागरिकांना पाठविली होती. ही बिलांची रक्कम मोठी असल्याने या ठिकाणच्या सोसायट्यांनी आक्षेप घेतला.
पालिकेकडून इतर मिळकतीं प्रमाणेच ४० टक्के निवासी सवलत दिली जात नसल्याचे तसेच नांदेड सिटी स्वत:च नागरिकांनी मीटरद्वारे पाणी पुरवठा करते, नांदेड सिटीकडूनच सांडपाणी शुद्ध केले जात असल्याचे पालिकेच्या निर्दशानास आणून दिले.
महापालिकेने ३४ टक्के दरानेच कर आकारणी करावी, अशी आग्रही भूमिका घेतली. त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातही दिसून आले. महापालिकेने नागरिकांना कर सवलतीसाठी पीटी-३ अर्ज भरून देण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांनुसार ज्या मिळकतधारकांनी पीटी ३ अर्ज भरून दिले आहेत.
त्यांची तपासणी करून महापालिकेने त्यांना २०२४-२५ या आर्थिक बिले पाठविण्यास सुरूवात केली आहे. नागारिकांची मागणी लक्षात घेऊन तसेच कायद्यातील तरतूदींची तपासणी करून बिलांची फेररचना करण्यात आली आहे. सुधारीत बिले नागरिकांना दिली जात आहे. परिणामी, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.





