महापालिका अधिकारी करताहेत “हर घर तिरंगा’बाबत जनजागृती

पिंपरी – भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने देदीप्यमान इतिहासाचे संस्मरण करण्यासाठी हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाची जास्तीत-जास्त जनजागृती करण्यावर महापालिकेचा भर आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी सर्वच स्तरावर पालिका मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. याचाच भाग म्हणून महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर सध्या “हर घर तिरंगा’ याविषयी हॅलोटोन वाजत आहे.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. देशात “आजादी का अमृत महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दि.11 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे “हर घर तिरंगा’ हा उपक्रम शहरात राबविण्यात येत आहे. यासाठी महापालिका तीन लाख राष्ट्रध्वज उपलब्ध करून देणार आहे.





