पिंपरी | आयुक्तांसह पालिका अधिकार्यांनी घेतला डेंग्युचा धसका

पिंपरी , (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबदाराची उपाय म्हणून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी स्वत: हाती झाडू घेत, आपल्या राहत्या घराची साफसफाई केली. तसेच डास उत्पत्तीची ठिकाणे नष्ट केली. सर्व अधिकार्यांना दिलेल्या सूचनेनंतर प्रत्येक अधिकार्याने हाती झाडू घेत, घरच्या स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवत असल्याचे दाखवून दिले.
पिंपरी चिंचवड शहर डेंग्यूमुक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतःच्या राहत्या बंगल्याची स्वच्छता करत या मोहिमेत सहभाग घेतला. महापालिकेच्या अधिकार्यांनीही आपले आरोग्य ही आपलीच जबाबदारी समजून राहत्या घरांची साफसफाई केली असून नागरिकांनी आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बीट डेंग्यू सूत्राचा अवलंब करावा,असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
शहराला डेंग्यू मुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डेंग्यू मुक्त पिंपरी चिंचवड शहर ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांनी आठवड्यात एका दिवसातील एक तास आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी आपल्या राहत्या घरी स्वच्छता करायची आहे. या मोहिमेत आज महापालिकेच्या अधिकार्यांनी सहभाग नोंदवत घरातील कुलर, फ्रीज, पाणी साठवणुकीची भांडी, झाडांच्या कुंड्या, घराच्या परस बागेची स्वच्छता केली.
मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे. नागरिक त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचे साठे हटवून डेंग्यूचा प्रसार रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. महापालिकेसमवेत नागरिकांनी एकत्रितपणे या उपक्रमात सहभाग घेतल्याने डेंग्यूला हद्दपार करण्यास नक्कीच यश मिळेल, असे मत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी व्यक्त केले आहे.
नागरिकांचे आरोग्य सुदृढ कसे ठेवता येईल यासाठी महापालिका प्रशासन सर्व प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ’बीट डेंग्यू’ या संकल्पनेचा अवलंब करावा आणि आपले घर व परिसर स्वच्छ व कोरडे ठेवावे. शेखर सिंह, आयुक्त,पिंपरी चिंचवड महापालिका.





