मोहित कंबोज यांना पालिकेची पुन्हा नोटीस

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीचे धाड सत्र सुरू असताना, आता शिवसेनेन याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. आज बेकायदेशीर बांधकामप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांना बीएमसीने पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे.
मोहित कंबोज यांना घराच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेने नोटीस पाठवली आहे. सात दिवसांत नोटीसीचे उत्तर द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा या नोटीसमधून पालिका प्रशासनाने दिला आहे. मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 अंतर्गत 351 अ् अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. पालिकेकडून झालेल्या पहाणीनुसार मंजुर करण्यात आलेल्या आराखड्यात अंतर्गत बदल करण्यात आले आहेत, असे नोटीस मध्ये सांगितले आहे.
इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृतपणे ऑफिससाठी खोली आणि सिक्युरिटी केबीन बांधकाम करण्यात आली आहे. लिफ्टच्या समोर लायब्ररीचे बांधकाम करण्यात आले आहे. इमारतीच्या अंतर्गत पार्किंगमध्ये काचालाऊन कॉमन स्टींग डायनिंग एरिया बनवण्यात आला आहे. यावर येत्या आठवड्याभरात मोहीत कंबोज यांना उत्तर द्यावे लागेल. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत कायदेशीर उत्तर देणार असल्याचे सांगितलं आहे.





