महापालिकेची रुग्णालये पडणार अपुरी

बेडची संख्या 1143 – रुग्णसंख्या 1041; आयसीयू, व्हेंटिलेटरची उणीव भासणार
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात रोज शंभरहून अधिक रुग्ण शहरात आढळत आहेत. तसेच शहराबाहेरील रहिवासी असणाऱ्या परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही खूप अधिक आहे. परिणामी महापालिकेच्या रुग्णालयातील बेड कमी पडू लागले आहेत.
कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयामध्ये 750 बेड आहेत. तर भोसरी येथील नवीन रुग्णालयामध्ये 85 बेड आहेत. हे दोन्हीही रुग्णालय करोनाबाधित रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. तर उर्वरीत रुग्णालयांमधील बेड देखील कमी असल्याने येत्या काही दिवसांत रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात बेड मिळणे अशक्य होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेची दहा रुग्णालये आहेत. त्यामध्ये वायसीएम, जिजामाता व भोसरी येथील नवीन रुग्णालय यामध्ये बेड संख्या जास्त आहे. उर्वरित सात रुग्णालयामध्ये बेड संख्या कमी आहे. शहरातील एकूण करोनाबधितांचा आकडा 2400च्या पुढे गेला आहे. त्यापैकी 1430 रुग्ण बरे झाले आहेत. तर 43 रुग्णांचा (डॅशबोर्डनुसार) मृत्यू झाला आहे. शहरात सद्यस्थितीत महापालिका क्षेत्रातील 924 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर महापालिकेच्या हद्दीबाहेरील 64 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील बेडचा विचार केला तर सद्यस्थितीत महापालिकेची रुग्णालये फुल्ल झाली आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 750, भोसरी येथील नवीन रुग्णालयात 85, जिजामाता रुग्णालयात 100 बेडची संख्या आहे. तर इतर सात रुग्णालयामध्ये 208 बेड आहेत. महापालिकेच्या दहा रुग्णालयांमध्ये 1143 बेड आहेत.
डॉक्टर व नर्सेसवर ताण
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये एकूण डॉक्टर संख्या 339 इतकी आहे. तर परिचारिकांची संख्या 449 इतकी आहे. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे रुग्णालयामधील डॉक्टर व परिचारिकांवरही ताण येत आहे. शहराच्या सर्वच भागात करोनाचे रुग्ण आढळत आहेत. दाट लोकवस्तीच्या भागात याचे प्रमाण जास्त आहे. बाजारपेठा, दुकाने औद्योगिक कंपन्या सुरु करताना रुग्णसंख्या वाढेल असा अंदाज व्यक्त करून प्रशासनाने सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्येक दिवशी रुग्णसंख्या वाढीचा नवा उच्चांक होत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जुलैअखेर रुग्णसंख्या होणार 10 हजार
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आठ खासगी रुग्णालयांचे बेड आरक्षित केले आहेत. महापालिका व खासगी असे मिळून 4 हजार बेडची तयारी केली आहे. इएसआय रुग्णालयात 90 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याव्यतिरिक्त खासगी आदित्य बिर्ला, लोकमान्य, निरामय, स्टर्लिंग याठिकाणी बेड आरक्षित केले आहेत. सद्यस्थितीत 12 ते 13 दिवसांनी रुग्ण डबल होण्याचा कालावधी आहे. चाचणीचे प्रमाण वाढवले आहे, त्यामुळे रुग्णही वाढणार आहेत. जुलैअखेर रुग्णांचा टप्पा 10 हजारांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत.
अत्यवस्थ रुग्णांसाठी कमी पडणार बेड
आयसीयू बेड फक्त वायसीएम रुग्णालयात उपलब्ध असून त्यांची संख्या 42 आहे. तसेच 23 चालू स्थितीतील व्हेंटिलेटर आहेत. वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता महापालिकेच्या रुग्णालयांमधील ही साधनसामग्री तोकडी पडत आहे. प्रशासनानुसार जुलै महिना अखेरपर्यंत एकूण करोनाबाधितांचा आकडा दहा हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाची लक्षणे असलेल्या आणि गंभीर रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी डॅशबोर्डने दर्शविलेल्या आकड्यानुसार आताच गंभीर रुग्णांची संख्या 33 इतकी आहे. ही संख्या वाढल्यास नागरिकांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागेल.







