Municipal Elections: महापालिका निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने, OBC आरक्षणासाठी लॉटरी, VV-PAT यंत्रांचा वापर नाही; राज्य निवडणूक आयुक्तांची मोठी घोषणा

Municipal Elections 2025 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Municipal Elections 2025) यंदा दिवाळीनंतर, म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस प्रक्रिया सुरू होणार असल्याची महत्त्वाची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिली. नाशिक विभागातील आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती जाहीर केली. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
वाघमारे यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, चार महिन्यांत महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका घेणे बंधनकारक आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने निवडणूक कार्यक्रम आखला जाणार आहे. मात्र, कोणत्या संस्थेची निवडणूक आधी होणार, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
50 लाखांहून अधिक मतदार, 17 हजार मतदान यंत्रे लागणार –
नाशिक विभागात एकूण 50 लाख 45 हजार मतदार असून, 4,982 मतदान केंद्रे स्थापन केली जाणार आहेत. यासाठी 8,705 कंट्रोल युनिट्स आणि 17,000 हून अधिक मतदान यंत्रांची आवश्यकता आहे. सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मनुष्यबळाची कमतरता भासू शकते, त्यामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
OBC आरक्षणासाठी लॉटरी पद्धत –
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत बोलताना वाघमारे म्हणाले, “SC-ST आरक्षण निश्चित आहे, तर OBC आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाईल. मागील निवडणुकांप्रमाणेच यावेळीही OBC आरक्षणाचे तत्त्व कायम राहील.”
मतदार यादी आणि प्रभाग रचनेचे काम सुरू –
निवडणुका 1 जुलै 2025 च्या मतदार यादीच्या आधारे होणार असून, प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाईल. निवडणुकीसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक यंत्रणेचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे, या निवडणुकांमध्ये VV-PAT यंत्रांचा वापर होणार नाही, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. दिवाळीनंतर निवडणूक प्रक्रियेला गती
दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबर अखेरीस निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून, याबाबत प्रशासकीय तयारी जोरात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह असून, प्रशासनही युद्धपातळीवर तयारी करत आहे.
एखाद्या विधानसभा मतदारसंघात एकच उमेदवार निवडून द्यायचा असतो, त्यावेळी व्हीव्हीपॅटचा वापर केला जातो. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅटचा वापर केला तर ती पद्धत अधिकाधिक वेळकाढू होते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली. दरम्यान, निवडणुका या ईव्हीएम मशीनद्वारेच होणार आहेत. तसेच या निवडणुका डिसेंबर ते जानेवारी महिन्यादरम्यान होतील, अशी देखील माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे.





