भोर : भोर शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अपूर्ण सिमेंट काँक्रीट कामामुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यावर आवाज उठवणाऱ्या तबरेज नासिर खान (रा. भेळकेवाडी, भोर) यांनी आज २३ जून रोजी भोर नगरपरिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला भाजप, अजितदादा गट, तसेच शिंदे गट, म . न .से, उ .बा.ठा गटाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा लाभला. तबरेज खान यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामुळे अखेर भोर नगरपरिषदेला जाग येत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे लेखी आश्वासन द्यावे लागले. तबरेज खान यांनी याआधी १० जून रोजी लेखी स्वरूपात नगरपरिषदेकरवी रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून फोन व प्रत्यक्ष भेटीद्वारे नगरपरिषद अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. 23 जून रोजी सकाळी ११ वाजता सुरु झालेले हे ठिय्या आंदोलन दुपारी २ वाजेपर्यंत चालले. आंदोलनादरम्यान नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांशी कोणतीही प्रत्यक्ष चर्चा केली नाही. मात्र, लेखी आश्वासनाद्वारे पुढील पाच ते सात दिवसांत खड्डे बुजवले जातील, असे सांगण्यात आले. त्यानुसार महापालिकेने लगेचच काम सुरु करून काही ठिकाणी दुरुस्तीचे काम पूर्णही केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. “जर एका सामान्य नागरिकाच्या आंदोलनामुळे प्रशासन काम करत असेल, तर इतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी व अधिकारी हे गप्प का?”, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. तबरेज खान यांनी स्पष्ट केले की, “हे आंदोलन कोणत्याही राजकीय स्वार्थापोटी नाही. मी निवडणूक लढवण्यासाठी नव्हे, तर माझ्या समाजासाठी हे काम करतो आहे. भोर शहरातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, गरिबांच्या हक्कासाठी मी कायम लढणार.” या आंदोलनाने भोर शहरात सामाजिक जागरूकतेचा नवा संदेश दिला असून, भविष्यात नागरिकांच्या प्रश्नांवर कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.