Pimpri : आजार रोखण्यासाठी महापालिकेची ‘ब्रेक द चेन’ मोहीम

पिंपरी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिकेतर्फे ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून शहरात डास निर्मूलन करणे असल्याचा वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले. सद्यस्थितीत शहरात डेंग्यूची लागण झालेला एक रुग्ण आहे.
या मोहिमेंतर्गत सोमवार ते शनिवार दररोज विविध क्षेत्रांमध्ये नियोजनबद्ध कार्यवाही केली जाईल. यामध्ये रुग्णालये, शाळा, बँका, मॉल्स, सिनेमागृहे, कार्यालये, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांमध्ये डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. जनजागृतीसाठी व्याख्याने, रॅली, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, सोशल मीडियावरील व्हिडिओज आणि एलईडी स्क्रिनद्वारे माहितीप्रसार या सर्व माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे.
याशिवाय, सामाजिक संस्थांच्या मदतीने चर्चासत्र, परिसंवाद आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याची योजना आहे. या मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नोडल वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, किटकनाशक निरीक्षक अशा अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या ८ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके शहरभर डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यरत राहतील.
काय आहे ब्रेक द चेन?
याअंतर्गत नागरिकांनी डेंग्यू रोखण्यासाठी पाच सूत्रे पाळावी. त्यामध्ये डास उत्पत्तीची ठिकाणे शोधा व नष्ट करा, स्वतःचे डासांपासून संरक्षण करा, फॉगिंग व कीटकनाशक फवारणीस सहकार्य करा,
ताप व इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, आणि पुरेसे पाणी प्या. ही पाच सूत्रे लक्षात घेऊन, शहरातील प्रत्येक नागरिकाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणाव्यात असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.
शहराच्या आरोग्यासाठी प्रशासन, वैधकीय विभाग, समाज आणि नागरिक एकत्रितपणे कार्यरत राहिले तर डेंग्यूसह सर्व कीटकजन्य व जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. म्हणूनच ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम फक्त वैद्यकीय विभागाची नव्हे तर प्रत्येक पिंपरी चिंचवडकराची जबाबदारी आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी





