पुणे | महापालिकेचा बड्या कंपन्यांना दणका

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून शहरातील पावसाळी वाहिन्यांमध्ये टाकण्यात आलेल्या खासगी कंपन्यांच्या केबल काढण्यास सुरूवात करण्यात आली. शहरात पावसाळ्यात पाणी साचलेल्या १२३ ठिकाणांची महापालिकेचे आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांनी मागील चार दिवसांत पाहणी केली होती.
या पाहाणीत अनेक पावसाळी वाहिन्यांमध्ये खासगी कंपन्यांच्या केबल आढळून आल्या, त्यानंतरअतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी सर्व ड्रेनेज तसेच पथ विभागाच्या उपअभियंत्यांची महापालिकेत मंगळवारी (दि.१८) बैठक घेतली. पावसाळी वाहिन्यांतील केबल तत्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार, पालिकेने कारवाई सुरू केलीअसून बुधवारी कोथरूड बस डेपोच्या परिसरातील केबल काढण्यात आल्या. या ठिकाणी पावसाळी वाहिनी असूनही सातत्याने पावसाचे पाणी साचत होते. त्यानंतर चेंबरची पाहाणी केली असता त्यात या केबल टाकल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जेसीबीने उपसून काढल्या केबल…
बस डेपोच्या समोर रस्त्यावर ज्या ठिकाणी पावसाळी वाहिनीच्या आत या केबल आढळल्या तेथे सुरूवातीला केबल काढण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले. त्यांच्याकडून सुरूवातीला काही केबल कापण्यात आल्या. मात्र, केबलची संख्या अधिक असल्याचे लक्षात आले. त्यामुळे, काही कर्मचाऱ्यांनी दोरी बांधून त्या ओढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्या निघत नसल्याने अखेर या केबल काढण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. यावेळी मात्र बाहेर आलेल्या केबल पाहून महापालिकेच्या अभियंत्यांनाही मोठा धक्का बसला. या केबल जाळ्यांचा कचरा एवढा मोठा होता की, पावसाळी पाणी वाहून जाणेच शक्य नसल्याचे दिसून आले. त्यानंतर आसपासच्या भागातही अशीच कारवाई करण्यात आली.
पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी वाहिन्या आहेत. त्यात कोणत्याही केबल अथवा सेवा वाहिन्या टाकता येत नाही. मी स्वत: आणि आयुक्तांनी शहरात तीन दिवस केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली. त्यानुसार, बैठक घेऊन तत्काळ या केबल काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. – पृथ्वीराज बीपी, अतिरिक्त आयुक्त, मनपा





