pune : डेंग्यू हटविण्यासाठी पालिका लागली कामाला
pune :

आरोग्य विभागाकडून डासोत्पत्तीची केंद्रे नष्ट करण्याची कार्यवाही
pune : शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया, झिका आणि मलेरियासारख्या कीटकजन्य आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. प्रतिबंध, उपचार, डास नियंत्रण आणि जनजागृती अशा स्तरांवर उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
ताप, अंगदुखी, पुरळ, सांधेदुखी आदी लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण, बाधित भागात विशेष वैद्यकीय शिबिरे, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांचा नाश आणि जनजागृती हाती घेतली आहे.
पुणेकरांना डेंग्युचा डंख या मथळ्याखाली दैनिक प्रभात मध्ये सोमवारी (दि. २७) सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. याची दखल घेत पालिकेने डासोत्पत्तीची केंद्रे नष्ट करत, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही सुरू केली.
आरोग्य विभागातर्फे पालिकेच्या दवाखान्यांमधील परिचारिकांकडून बाधित भागात घराघरांत आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. आशा स्वयंसेविका व महिला आरोग्य समित्यांच्या माध्यमातून नागरिकांना कोरडा दिवस पाळण्यासह घरातील डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली जात आहे.
वॉर्डस्तरावर खासगी व शासकीय डॉक्टरांच्या बैठका घेऊन संशयित रुग्णांची वेळेत तपासणी करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच खासगी प्रयोगशाळांना रक्त तपासणीचे अहवाल तातडीने पालिकेला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.
ज्या भागात रुग्णसंख्या अधिक आहे, तेथे तात्पुरती वैद्यकीय शिबिरे भरवून मोफत ओपीडी सेवा दिली जात आहे. दवाखाने व रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांची नोंद ठेवली जात असून आवश्यक औषधसाठाही उपलब्ध आहे. झिका संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांची उच्च-जोखीम गटात नोंदणी करून त्यांची नियमित तपासणी व उपचार सुरू आहेत.
कीटक नियंत्रणासाठी बाधित भागात कीटकनाशकांची फवारणी, धूर फवारणी (फॉगिंग), डासांच्या अळ्यांचा नाश, कायमस्वरूपी व हंगामी पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात येत आहे.





