स्वच्छ सर्वेक्षणसाठी महापालिकेची तयारी

पिंपरी – गेल्या तीन वर्षांपासून शहर स्वच्छ भारत अभियानात पिछाडीवर असल्यामुळे महापालिकेची मोठी नाचक्की झाली होती. मात्र, यंदा महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण 2022 साठी मोठी कंबर कसली आहे. त्यामुळे यावर्षी शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहामध्ये क्रमांक येण्याचा महापालिका प्रशासनाला आशावाद असून दोन दिवसांत केंद्र सरकारचे पथक सर्वेक्षणासाठी शहरात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान हा केंद्र सरकारचा उपक्रम आहे. या अंतर्गत देशातील शहराचा स्वच्छतेमध्ये क्रमांक काढण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातील महत्वाचे रस्ते स्वच्छ ठेवण्यासाठी रोड मार्शल, ग्रीन मार्शलची नियुक्ती करण्यात आली. शहरात प्लॉस्टिक बंदीची काही प्रमाणात अंमलबजावणी झाली असून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. तीन महिन्यांपासून शहरात 80 टक्के कचरा विलगीकरण सुरू आहे. महत्वाच्या चौकात, झोपडपट्टी परिसरात रंगरंगोटी करण्यात आली आहे. या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण आणि पर्यावरणाची जनजागृती करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात नागरिकांचाही सहभाग असावा या उद्देशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचाही अभिप्राय घेण्यात येत आहे.
दरम्यान, 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर टॉप 10 मध्ये आले होते. शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून 1 नंबर आला होता. 2017 पासून त्यात घसरण सुरु झाली. 2017 मध्ये शहर पिछाडीवर गेले. 9 व्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर थेट 72 व्या क्रमांकावर फेकले गेले होते. 2018 मध्ये देशात 43 वा तर राज्यात सहावा क्रमांक होता. 2019 मध्ये पुन्हा त्यामध्ये घसरण झाली होती. शहराचा देशात 52 वा तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता. 2020 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात शहराची सुधारणा झाली असून देशात 24 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला होता. त्यामुळे यावर्षी चांगली कामगिरी करण्याचे महापालिका प्रशासनापुढे आव्हान आहे.
प्राजक्ता माळी करताहेत जनजागृती
स्वच्छ सर्वेक्षणसाठी महापालिकेच्या वतीने अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची ब्रॅन्ड ऍम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण संबंधी अभिनेत्री प्राजक्ता यांचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करून जनजागृती करण्यात आली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात गेल्या तीन वर्षांत शहराची कामगिरी चांगली नव्हती. मात्र, यावेळेस आरोग्य विभागाने स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध चांगले उपक्रम राबविले आहेत. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. यावर्षी स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा चांगला क्रमांक येण्याचा आशावाद असल्याचे ते म्हणाले.
– गणेश देशपांडे, आरोग्य अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका





