पुणे | थकबाकी प्रकरणी महापालिका आक्रमक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वसुलीसाठी नोटीस बजावूनही निवडणुकीच्या तोंडावर अभय योजनेत थकबाकी माफ होईल, या प्रतिक्षेत असलेले मिळकतधारक कर भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे उत्पन्न वाढत नसल्याने मनपा कर संकलन विभागाने आता थकबाकीदारांच्या मिळकती सील करण्याची कारवाई तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या पाच परिमंडळाच्या स्तरावर पाच पथके तैनात करण्यात आली असून, पथकांना दिवसाला १०० ते १२५ मिळकती सील करण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रभारी प्रमुख माधव जगताप यांनी दिली. याबाबतचे परिपत्रकच जगताप यांनी काढले असून, ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
कर संकलन विभागास २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २,५०० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, आर्थिक वर्ष संपण्यास शेवटचा दीड महिना राहिला असून, तिजोरीत अवघे १,९५० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर महापालिकेस सील केलेल्या मिळकतींच्या लिलावातून ५६ कोटींचा महसूल मिळेल. तसेच मार्च अखेरपर्यंत आणखी २०० ते २५० कोटींची थकबाकी जमा होईल, अशी आशा होती. मात्र, दोन लिलावांतून पालिकेस आतापर्यंत १८ लाख रु. मिळाले आहेत. तसेच कर्मचारी नसल्याने थकबाकी वसुलीचे काम जवळपास थांबले आहे. त्यामुळे प्रशासनाने आता मिळकती सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुट्टीच्या दिवशीही भरता येणार कर
नागरिकांना मिळकतकर भरता यावा, यासाठी नागरी सुविधा केंद्र सर्व शासकीय सुटीच्या दिवशी व शनिवारी सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत तर रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत खुली असतील. त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीनेही मिळकतकर भरता येणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.




