नवी दिल्ली : मुंबई 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी आणि भारताचा सर्वात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अझहर याच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरला हार्ट अटॅक आला आहे. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच त्याला उपचारासाठी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात नेण्यात आले. मसूद अझहरला कराचीतील संयुक्त लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी मौलाना मसूद अझहरला खोस्त प्रांतातील गोरबाज भागातून पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. त्याला लवकरच रावळपिंडीतील सर्वात मोठ्या आणि सुसज्ज लष्करी रुग्णालयात दाखल केले जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानने दहशतवादी मसूद अझहरला फक्त आश्रयच दिला नसून त्याला भारत विरोधी कारवायांसाठी मोकळं रानही दिले आहे. मसूद हा पाकिस्तानमध्ये स्वयंसेवी संस्था आणि राजकीय पक्षही चालवतो. कोण आहे दहशतवादी मसूद अझहर? दहशतवादी मसूद अझहरचा जन्म 1968 मध्ये झाला होता. त्याचे पूर्ण नाव मौलाना मसूद अझहर आहे. पाकिस्तानात बसून त्याने भारतात अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. तो ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. या दहशतवादी संघटनेने केवळ भारतातच नाही तर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्येही आपल्या दहशतवादी कारवाया केल्या आहेत. संयुक्त राष्ट्राने या संस्थेला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. मसूद अझहर हा भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.