वर्सोव्यात अज्ञातांकडून शिंदे गटाच्या विभागीय कार्यालयावर दगडफेक

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्सोव्यात उद्घाटनाआधीच शिंदे गटाच्या कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. या दगडफेकीमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांच्याकडून ‘एकनाथ भवन’ विभागीय कार्यालय उभारण्यात आले होते.
आज गणपती विसर्जनानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन होणार होते. मात्र उद्घाटनाआधीच कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. दगडफेकीप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याने दगडफेक केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी तपासासाठी दोन ते तीन टीम तैनात केल्या आहेत.





