साकीनाका बलात्कार पीडितेला 8 महिन्यांत न्याय; न्यायालयाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

मुंबई – बलात्कार पीडितांना न्यायासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागते. मात्र साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेला न्याय मिळाला असून दिंडोशी सत्र न्यायलयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
३२ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्यानंतर आठ महिन्यांच्या आत दिंडोशी सत्र न्यायालयाने सोमवारी ४४ वर्षीय आरोपी मोहन चौहानला दोषी ठरवलं होतं. आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
मोहन चौहान याला खून, बलात्कार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांसह दोषी ठरवण्यात आलं होतं.
गेल्या वर्षी अर्थात १० सप्टेंबर २०२१च्या मध्यरात्री साकी नाका येथे महिला जखमी अवस्थेत आढळली. तिला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे ११ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यात आरोपी चौहानला अटक करण्यात आली. राज्य सरकारने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांची नियुक्ती केली होती.
आरोपीने पीडितेच्या खाजगी भागात धारदार वस्तू घातली होती, ज्यामुळे गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यातच तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १८ दिवसांत चौहानविरुद्ध ३४६ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.





