Mumbai Rain Update : पावसाचा जोर कमी, पण 8 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; गणेशोत्सवापूर्वी कोकणात मुसळधार

मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून अति मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती हळूहळू निवळत आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंतच्या टर्फ लाइनमुळे पावसाचा जोर कायम होता, पण आता त्याची तीव्रता कमी झाल्याने अनेक भागांत पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तरीही, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे (घाटमाथा), सातारा आणि विदर्भातील काही भागांसाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा कायम ठेवला आहे.
‘या’ 8 जिल्ह्यांसाठी अलर्ट
हवामान खात्याने आज (22 ऑगस्ट) पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे (घाटमाथा), सातारा आणि कोल्हापूरसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरीसाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट कायम आहे. विदर्भात आज पावसाची विश्रांती असली, तरी उद्या (23 ऑगस्ट) आणि परवा (24 ऑगस्ट) पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये 50 किमी/तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
कोकणात गणेशोत्सवापूर्वी पावसाचं आव्हान
गणेशोत्सव (27 ऑगस्ट) जवळ येत असताना, तळ कोकणात रायगड आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आव्हानात्मक आहे. अति मुसळधार पावसामुळे धरणं तुडुंब भरली आहेत. उजनी धरण 105% पेक्षा जास्त भरलं असून, 16 दरवाज्यातून 1.5 लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे भीमा नदी ओसंडून वाहत आहे, आणि पंढरपूर परिसरातील 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
सध्याची पूर परिस्थिती काय?
– गडचिरोली : इंद्रावती नदीच्या पुरामुळे सोमनपल्लीजवळील राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही हा मार्ग पाण्याखाली गेला.
– नालासोपारा : मुसळधार पावसामुळे पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलं असून, पोलिसांना अशा परिस्थितीत काम करावं लागत आहे.
– धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावात बोरी नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. गावकऱ्यांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे.
उर्वरित महाराष्ट्रात हवामान
उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मुंबई आणि उपनगरांत आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर पुणे शहरात हलका पाऊस आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे.





