कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकही अडचणीत; मुंबई पोलिसांनी थेट बजावले समन्स

मुंबई : कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगात्मक गाणं गात टीका केली होती. त्यानंतर संतापलेल्या शिंदेंच्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देखील मंजूर केला. दरम्यान, कुणाल कामराच्या घरी जाऊन मुंबई पोलीसांनी चौकशी केली आहे. दुस-या समन्सची मुदत संपत आली, तरी कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी अद्याप हजर झालेला नाही.
तर दुसरीकडे कुणाल कामरामुळं त्याचे प्रेक्षकही अडचणीत आले आहेत. ‘नया भारत’ शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना मुंबई पोलिसांनी थेट समन्स बजावले आहे. या प्रकरणी भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी आणि आता वकील असलेले वाय.पी. सिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या भुमिकेमुळं कामराच्या चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
पोलीसांचे एक पथक कामराच्या घरी
खार पोलिसांनी दोन वेळा चौकशीसाठी समन्स बजावूनही कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात हजर झालेला नाही. तो का आला नाही?, याची चौकशी करण्याकरता पोलीसांचे एक पथक माहिम येथील कामराच्या घरी गेले होते. त्याच्या घरच्यांनी तो घरी नसल्याचे कळवल्याने पोलीस लगेच आल्या पावली परत गेले. आता पोलिस त्याला तिसऱ्यांदा समन्स बजावणार का? असा सवाल उपस्थित होत असतानाच पोलिसांच्या रडारवर आता प्रेक्षकही असल्याचे समजते.
पोलिसांना प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार
मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १७९ अंतर्गत प्रेक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कलमांतर्गत पोलिसांना प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. पोलिसांना या शोमधील एक-दोन प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. मात्र, या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याची आवश्यकता नसल्याचे माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय. पी. सिंह यांनी म्हटले आहे.
प्रेक्षकांचे जबाब घेण्यास सुरुवात
कुणाल कामराने २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ‘युनिकॉन्टिनेंटल’ हॉटेलमधील ‘द हॅबिटॅट’ या स्टुडिओमध्ये ‘नया भारत’ हा स्टॅण्ड अप कॉमेडी शो आयोजित केला होता. याच शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कविता सादर केली होती. या शोमध्ये जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना देखील पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलीस या शोमधील प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार असून काही प्रेक्षकांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळत आहे.





