Mumbai Police : नागपूर राड्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर; उचललं महत्त्वाच पाऊल…

Mumbai Police । Aurangzeb tomb : नागपूर दंगलीच्या काही तास आधी, दोन वेगवेगळ्या ठिकाणी डझनभर लोकांना जमवणारी व्यक्ती म्हणून 17 मार्चच्या नागपूर हिंसाचाराच्या संदर्भात नोंदवलेल्या एफआयआरमध्ये फहीम शमीम खानची ओळख पटली असून, त्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, खानने सुमारे 500 लोकांचा जमाव भडकावल्याचा आरोप आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात चकमकी, तोडफोड आणि स्थानिक पोलिसांवर हल्ले झाले.
एफआयआरनुसार, बजरंग दल आणि विहिंपच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करत निषेध केला आणि औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. दोन गटांमध्ये तणाव वाढला, ज्यामुळे दगडफेक, जाळपोळ आणि हल्ले झाले.
यामध्ये पोलिसांसह काही नागरीक जखमी झाले आहेत. दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला असला तरी या घटनेनंतर राज्यात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दंगलीच्या या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत.
मुंबईत एमआयडीसी पोलिसांकडून मरोळ माफखान नगर परिसरात आणि संवेदनशील भागात मॉकड्रिल आणि रूट मार्च काढण्यात आला. रमजान ईद आणि गुढीपाडवा सणानिमित्ताने मुंबई पोलिसांकडून संवेदनशील भागामध्ये दंगल विरोधी पथकाकडून मॉकड्रील करण्यात आलं.
मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी आणि अंधेरी पोलिसांकडून संवेदनशील भाग मरोळ मापखान परिसरात हे मॉकड्रील पार पडलं. या मॉकड्रिल मध्ये अंधेरी आणि एमआयडीसी पोलिसांचे जवळपास 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सोबत अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.
यावेळी हिंसाचार घडल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहचून परिस्थितीवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवतात, मॉकड्रिलच्या माध्यमातून पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेथील संशयित हालचालींवर लक्ष देखील ठेवण्यात आले आहे.





