मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 5 राज्यातील 9 मुलींची सुटका

मुंबई – मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने मुंबईतील वर्सोवा परिसरातील स्पामध्ये छापा टाकून 9 मुलींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. वर्सोव्यातील चार बंगला परिसरात रिव्हायव्हल वेलनेस स्पामध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
शनिवारी रात्री पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. यावेळी सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या 9 मुलींची सुटका करण्यात आली. चौकशीदरम्यान, मेघालय, मणिपूर आणि मिझोराम या ईशान्येकडील राज्यांतील गरीब मुलींना मुंबईत आणून त्यांना स्पा सेंटरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे उघड झाले आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी अंधेरी पश्चिम म्हाडासारख्या निवासी भागात अनेक तास छापे टाकले. या कालावधीत मणिपूरमधील 4, मिझोराममधील 2, मेघालयातील 1, कोलकाता 1 आणि लखनऊमधील 1 मुलींची सुटका करण्यात आली.
मुख्य सुत्रधाराचा शोध सुरु –
स्थानिक वर्सोवा पोलिसांनी एफआयआर नोंदवून स्पा व्यवस्थापक चंद्रकांत निकम उर्फ बंटी याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिमांड अर्जानुसार, स्पाचा मालक अतुल धिवर असून तो या सेक्स रॅकेटचा मुख्य सुत्रधार आहे. सध्या तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वर्सोवा पोलिसांनी स्पा व्यवस्थापक चंद्रकांत निकम उर्फ बंटी आणि मालक अतुल धिवार यांच्याविरुद्ध एफआयआर क्रमांक ५५२/२०२३ मध्ये कलम ३७० (३), ३४ आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी फरार स्पामालक अतुल धिवार याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.
अनेक मुली अडकल्याचा संशय –
सामाजिक सुरक्षा पथकाने टाकलेल्या छाप्यात फरार आरोपी अतुल धिवार याचा भाऊ हर्षद धिवार याची स्पा सेंटरवर चौकशी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल धिवारच्या भावाचीही भूमिका तपासली जात आहे. फरार आरोपी अतुल धिवारच्या अनुपस्थितीत त्याचा भाऊ हर्षद धिवार हा स्पाचे काम सांभाळत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या टोळीच्या तावडीत आणखी मुली असण्याची शक्यता मुंबई पोलिसांना आहे.





