Mumbai News : मुंबईत मुसळधार पावसाने हाहाकार ! मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला; 3 जण जखमी

मुंबई : मुंबईत रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि जीर्ण इमारतींच्या कोसळण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंधेरी पश्चिम येथील डी.एन. नगर पोलीस अधिकारी वसाहतीतील इमारत क्रमांक ८ मधील रूम नं. १४५ (पहिला मजला) येथे रविवारी पहाटे २ वाजता स्लॅब कोसळण्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत तीन लहान मुले जखमी झाली असून, त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला आहे. या घटनेने पोलीस वसाहतीत राहणाऱ्या कुटुंबांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
स्लॅब कोसळण्याच्या या घटनेनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी घर खाली करून भाड्याच्या निवासस्थानात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही या वसाहतीत स्लॅब कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या असून, पोलीस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे (PWD) वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, विभागाच्या निष्काळजीपणामुळे दुरुस्ती आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाले, ज्यामुळे पुन्हा एकदा जीवितहानीचा धोका निर्माण झाला.
यामुळे पोलीस कर्मचारी आणि रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ढिसाळ कारभाराला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.“पोलीस अधिकाऱ्यांचीच ही अवस्था असेल, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
भिंत कोसळून एकाचा मृत्यू
दुसरीकडे, मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैदराबाद स्टेट येथे मुसळधार पावसामुळे संरक्षण भिंत कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. आज सकाळी ११:४५ वाजताच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सतीश निरके (वय ३५) यांचा भिंत अंगावर पडल्याने मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्यांना मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु रुग्णालय प्रशासनाने त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईत अशा दुर्घटना वाढत असून, प्रशासनाने जीर्ण इमारती आणि संरचनांच्या देखभालीकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





