Mumbai News : मुंबईत (Mumbai News) अवैध बांगलादेशी घुसखोरीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत 20 हून अधिक अवैध बांगलादेशी नागरिक ताब्यात घेतले आहेत. हे सर्वजण भारतात वैध कागदपत्रांशिवाय राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमधून शहराच्या सुरक्षेशी तडजोड नाही, मोहीम सुरूच राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या कारवाईने पुन्हा एकदा घुसखोरीच्या नेटवर्कचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयास्पद व्यक्ती वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती एटीसी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी रात्री विशेष शोधमोहीम राबवली. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पुरुष आणि महिलांचा समावेश असून, त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा किंवा वास्तव्याचा कोणताही अधिकृत पुरावा आढळलेला नाही. पोलिसांनी त्यांच्या विरोधात पारपत्र कायदा आणि परकीय नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.