Baba Siddique : …म्हणून उत्तर प्रदेशमधून शुटर्स बोलावले; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी आपल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामध्ये त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी उत्तर प्रदेशमधून शुटर्स का बोलावले याचादेखील खुलासा केला आहे.
काय करण्यात आला खुलासा?
बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुरुवातीला पुणे आणि ठाण्यातील शुटर्सना संपर्क करण्यात आला होता. पण या कामासाठी त्यांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. पण रक्कम जास्त असल्याने शुभम लोणकरने आपला प्लान बदलला. त्यानंतर शुभमने हत्येची सुपारी उत्तर प्रदेशच्या शुटर्सना दिली. यासाठी त्यांना केवळ 50000 रुपये प्रत्येकी देण्यात आले होते.
बाबा सिद्दीकींचा बॉडीगार्ड निलंबित
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत शुभम लोणकर, शिवकुमार आणि झीशान मुख्य आरोपी आहेत. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी अम्बरनाथ आणि डोंबिवलीतून पाच आरोपींना अटक केली आहे. 12 ऑक्टोबरला बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.





