Sandeep Deshpande : येत्या काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, निवडणुकीच्या दृष्टीने कंबर कसली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे मुंबई महापालिकेकडे लागलेले आहे. मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची येणार? याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महापौरविषयी मोठं विधान केले आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि मनसेचा होणार असल्याचा विश्वास संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचा मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यातून पक्षाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईच्या महापौरबाबत विधान करत ठाकरे बंधूवर टीकेची झोड उठवली होती. त्याच पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी मुंबईचा महपौर हा मराठीच असणार असल्याचे विधान केले आहे. हिंदी भाषेच्या जाहिरातीवरून थेट इशारा हिंदी भाषेत लावण्यात आलेल्या जाहीरातींवर संदीप देशपाडे यांनी संताप व्यक्त केला. ज्या पद्धतीने मुंबई मेट्रोच हिंदीकरण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत त्याला आमचा सक्त विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदी जाहिराती महाराष्ट्र नवनिर्माण सेना चालू देणार नाही, असा थेट इशाराच संदीप देशापांडे यांनी दिला. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी योग्यच केले असल्याचे त्यांनी सांगितले. जाहिरात करण्याला विरोध नाही, पण हिंदी भाषेतील जाहिराती आम्ही चालू देणार नाही, असेही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. हेही वाचा : आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात तेजी ; सेन्सेक्स ३३० अंकांनी तर निफ्टी २४७५० नी वधारला