मुंबई हे सर्वात महाग प्रॉपर्टी मार्केट ! घरांच्या दरवाढीत जगात दुसऱ्या स्थानावर; अहवाल काय सांगतो, पाहा…..

नवी दिल्ली – जून मध्ये संपलेल्या तिमाहीत निवासी मालमत्तांच्या किंमत दरवाढीत जागतिक स्तरावरील ४४ शहरांमध्ये मुंबई आणि दिल्ली अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत, असे नाइट फ्रँक नावाच्या एका संस्थेने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
या तिमाहीत २६ टक्के वार्षिक वाढीसह मनिला प्रथम क्रमांकावर आहे.
मुंबई शहरातील प्राइम रेसिडेन्सीमधील दरवाढ वार्षिक १३ इतकी नोंदवली असून या बाबतीत हे शहर जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, जे वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीत ६ व्या क्रमांकावर होते.दिल्ली शहरातील प्रमुख ठिकाणच्या निवासी मालमत्तेच्या दरवाढीचे प्रमाण १०.६ टक्क्यांनी वाढले आहे.
बेंगळुरूमध्ये वार्षिक किमतीत ही वाढ ३.७ टक्के इतकी होती. त्या आधारावर हे शहर आता जागतिक यादीत १५ व्या स्थानावर आहे.
इतर जागतिक शहरांमध्ये, लॉस एंजेलिस किमतीत ८.९ टक्के वाढीसह चौथ्या स्थानावर आहे,
त्यानंतर मायामी (७.१ टक्के), नैरोबी (६.६ टक्के), माद्रिद (६.४ टक्के), लिस्बन (४.७ टक्के), सोल (४.६ टक्के), आणि सॅन फ्रान्सिस्को (४.५ टक्के) या शहरांचा समावेश आहे. दुबई, बँकॉंक, व्हिएन्ना या प्रमुख शहरांमधील घरांच्या किंमतीत मात्र या काळात घट झाली आहे.





