Chhota Rajan : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला ‘या’ प्रकरणात जामीन मंजूर

मुंबई : गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला एका प्रकरणात जामीन मिळाला आहे. 2001 मधील जय शेट्टी हत्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने छोटा राजनला जामीन मंजूर केला आहे. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जय शेट्टी यांच्या हत्येप्रकरणात राजनला दोषी ठरवण्यात आलं होतं. या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
जन्मठेपेची शिक्षाही स्थगित
छोटा राजन सध्या तिहारच्या जेलमध्ये आहे. 2001 मध्ये हॉटेल व्यावसायिक जय शेट्टी यांच्या हत्येप्रकरणात राजनला दोषी ठरवण्यात आलं होतं. 30 मे 2024 रोजी विशेष मकोका न्यायालयाने छोटा राजनसह इतर आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आज राजनला जामीन मंजूर केला आहे. तसेच विशेष मकोका न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्याच्या अपीलावर निर्णय येईपर्यंत त्याची जन्मठेपेची शिक्षाही स्थगित करण्यात आली आहे. राजनला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
काय आहे जय शेट्टी हत्या प्रकरण?
मध्य मुंबईतील गमदेवी येथील ‘गोल्डन क्राउन’ हॉटेलचे मालक जय शेट्टी यांची 4 मे 2001 रोजी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राजन टोळीच्या गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. छोटा राजन टोळीचा सदस्य हेमंत पुजारी याच्याकडून शेट्टीला खंडणीचे फोन आले होते आणि पैसे न दिल्याने त्याची हत्या करण्यात आली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.





