Mumbai High Alert : मुंबईत हायअलर्ट जारी; समुद्रमार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात

मुंबई : भारत-पाकिस्तान युद्धावर आता युद्धविराम लागला आहे. सध्या देशाच्या सीमेवर तणावपूर्ण शांतता असली तरी जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमधील जीवन पूर्वपदावर येत आहे. पण तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आहेत. पण मुंबईत समुद्रमार्गांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आणि 26/11 ला समुद्रामार्गे येऊनच आतंकवाद्यांनी मुंबईवर हल्ला केल्याने आता शहराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अरबी समुद्र आणि मुंबईच्या किनारपट्टीवर नौदलाचे उत्तर आणि पश्चिम ताफे तैनात करण्यात आले आहेत.
याशिवाय, मच्छीमारांच्या नौका आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यांच्या हालचाली, ओळखीची पडताळणी आणि गस्तीच्या माध्यमातून कोणतीही संशयास्पद हालचाल रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल संयुक्तरित्या समुद्रात गस्त घालत आहेत. गेट वे ऑफ इंडिया, बंदर परिसर आणि समुद्रमार्गे येणाऱ्या पर्यटकांवरही अधिक लक्ष दिले जात आहे. प्रवेशद्वारांवर तपासणी वाढवण्यात आली आहे.





