Protest Against Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; मुंबईत CJPचे आंदोलन, शिवाजी पार्क परिसरात कडेकोट बंदोबस्त
Protest Against Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJPने मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन पुकारले आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.

Protest Against Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आज, गांधी जयंतीच्या दिवशी, मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन पुकारले आहे. पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही आंदोलन करण्यावर CJPचे संस्थापक अभिजीत दीपके ठाम आहेत. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
CJPकडून निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तसेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दीपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन दिल्लीतील जंतर-मंतरपर्यंत नेण्याचे सांगितले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी काही निर्णयांबाबत आक्षेप घेतल्याच्या वृत्तानंतर SIR प्रक्रियेवर राजकीय वाद वाढला आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडूनही आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी CJPच्या आंदोलनावर टीका करत विरोधकांकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा दावा केला. दुसरीकडे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.





