एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; मुंबईत सव्वा वर्षासाठी शिवसेनेला महापौरपद मिळणार?
BMC Mayor Post : भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत झालेल्या करारानुसार सव्वा वर्षांसाठी शिवसेनेला महापौरपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

BMC Mayor Post : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका महापौरपदावर अखेर महायुतीत तोडगा निघाल्याची माहिती समोर आली आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात सव्वा वर्षांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापौरपद देण्यावर दोन्ही पक्षांत एकमत झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 29 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीनंतर हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा आहे. या निर्णयानुसार सत्ताकाळात कोणत्याही टप्प्यावर सव्वा वर्षांसाठी शिंदे गटाचा महापौर मुंबईत विराजमान होईल. मात्र, त्या पदावर कोणत्या नगरसेवकाची निवड होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
यंदाच्या निवडणुकीत प्रथमच भाजप सर्वाधिक 89 जागा जिंकत महापालिकेत सर्वात मोठा पक्ष ठरला. शिंदे गटाच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या. दोन्ही पक्षांनी मिळून 114 चा बहुमताचा आकडा गाठत महायुतीची सत्ता स्थापन केली.
दरम्यान, ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले, तर बहुमत मिळवण्यात युती अपयशी ठरली.
महापौरपदावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका घेण्यात आल्या. त्यानंतर मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्येही सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. समिती अध्यक्षपदांबाबतही दोन्ही पक्षांत समन्वय साधण्यात आला आहे.
सध्या भाजपच्या नगरसेविका रितू तावडे महापौरपदी विराजमान आहेत. महिला राखीव प्रवर्गातून त्यांची निवड झाली होती. मात्र, नव्या फॉर्म्युल्यानुसार त्यांना कार्यकाळातील सव्वा वर्षांनंतर पद सोडावे लागू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
महायुतीतील समन्वय राखण्यासाठी हा तडजोडीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात असून, आगामी काळात मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणावर याचा मोठा परिणाम होणार आहे.





