Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी? ‘या’ नावांची होतेयं चर्चा
Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या निवडीसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार

Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी आता कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या ३१ मार्च रोजी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी निवृत्त झाल्यानंतर या पदासाठी काहींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
महापालिका आयुक्त पदासाठी संजय मुखर्जी, असीम गुप्ता, व्ही. राधा, अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, मिलिंद म्हैसकर या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची यांची नावे चर्चेत आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आणि मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर ही दोन नावे सध्या आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.
अश्विनी भिडे
अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.
तसेच मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख मिळाली आहे.
डॉ. मिलिंद म्हैसकर
डॉ. मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे अनुभवी आयएएस अधिकारी असून, सार्वजनिक बांधकाम विभागातील त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व केले आहे. प्रशासनातील त्यांच्या अनुभवामुळे तेही या पदासाठी मजबूत दावेदार मानले जात आहेत. Mumbai BMC Commissioner
तर व्ही. राधा यांनी प्रशासकीय सुधारणांसंदर्भात अलिकडील काही महिन्यांमध्ये मोठे काम केले आहे. विकास खारगे यांचा लौकिक अत्यंत प्रामाणिक अधिकारी असा आहे. डॉ. संजय मुखर्जी हे गतिमान कारभारासाठी ओळखले जातात.
अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार
मुंबई महापालिका आयुक्तपदाच्या निवडीसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असून, त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा होणार असल्याचे समजते. मुंबई महापालिकेत शिंदेसेना हा भाजपचा मित्र आहे.
शिवाय नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबरच शिंदे यांना मान्य असेल अशा अधिकाऱ्याला संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान, मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा कारभार सांभाळणाऱ्या महापालिकेचे आयुक्त पद हे जवळपास राज्याच्या मुख्य सचिवाच्या दर्जाचे मानले जाते. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तपदाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. Mumbai BMC Commissioner
हेही वाचा:
Rinku Rajguru Romeo post : रिंकू राजगुरूने ‘डार्लिंग’ म्हणत शेअर केली खास पोस्ट






