#IPL2020 : मुंबईचा एकतर्फी विजय

दुबई – सलामीवीर इशान किशनची नाबाद 72 धावांची खेळी व त्याने कॉन्टन डीकॉक व सूर्यकुमार यादवसह केलेल्या भागीदारीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 9 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे प्ले-ऑफमधील स्थान कायम राखण्याच्या दिल्लीच्या स्वप्नांना धक्का बसला आहे.
मुंबईने किशन, डीकॉक व सूर्यकुमार यांच्या फलंदाजीने केवळ एक बळी गमावून विजयासाठी आवश्यक 111 धावा केल्या व एकहाती सामना जिंकला. मुुंबईची फलंदाजी सुरू झाल्यावर सुरुवात जरी संथ झाली असली तरीही त्यानंतर किशन व डीकॉक यांनी 68 धावांची सलामी दिली. यावेळी आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात डीकॉक 26 धावांवर बाद झाला. त्यानंतर किशन व सूर्यकुमार यांनी आणखी नुकसान होऊ दिले नाही.
किशनने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर धावांचा वेग वाढवला. त्याने नाबाद 72 धावांच्या खेळीत 47 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व 3 षटकार फटकावले. सूर्यकुमार 12 धावांवर नाबाद राहिला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 43 धावांची अभेद्य भागीदारी केली व संघाचा विजय 15 व्या षटकातच साकार केला.
तत्पूर्वी, मुंबईचा कर्णधार कॅरन पोलार्डने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. सामन्याच्या पहिल्याच षटकांत मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेन्ट बोल्टने शिखर धवनला बाद करत थाटात सुरुवात केली. या धक्क्यातून दिल्लीचा संघ सावरूच शकला नाही. त्यांचे फलंदाज एकापाठोपाठ बाद झाले. बोल्टने डावातील तिसऱ्या षटकांत पृथ्वी शॉला बाद केले.
लेगस्पीन गोलंदाज राहुल चहरने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला बाद करत मुंबईला आणखी एक यश मिळवून दिले. त्याला साथ देत चांगली फलंदाजी करत असलेला ऋषभ पंतही फार काळ टिकू शकला नाही. त्यानंतर मार्कस स्टोनिसही अपयशी ठरला. या दोघांना जसप्रीत बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला.
दुसऱ्या बाजूने नाथन कुल्टरनाइलने भरात असलेल्या शेमरन हेटमायरला बाद करत दिल्लीचा डाव आणखी अडचणीत आणला. दुसरा स्पेल टाकत असताना बोल्टने रवीचंद्रन अश्विनला बाद केले. त्यावेळी खेळपट्टीवर प्रवीण दुबे व कागिसो रबाडा ही जोडी खेळत होती. त्यांनी काही आक्रमक फटके मारून संघाचे शतक फलकावर लावले. अखेरच्या षटकांत रबाडा धावबाद झाला व दिल्लीचा डाव 9 बाद 110 धावांवर रोखला गेला.
रोहित शर्मा मॅचफिट नाही
रोहित शर्माची दुखापत मॅचफिट नाही, त्यामुळेच त्याच्या तंदुरुस्तीकडे वैद्यकीय अधिकारी सातत्याने लक्ष ठेवून आहेत, अशी सारवासारव बीसीसीआयने केली आहे.
संक्षिप्त धावफलक :-
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 9 बाद 110 धावा. (श्रेयस अय्यर 25, ऋषभ पंत 21, प्रवीण दुबे नाबाद 7, कागिसो रबाडा 12, जसप्रीत बुमराह 3-17, ट्रेन्ट बोल्ट 3-21). मुंबई इंडियन्स – 14.2 षटकांत 1 बाद 111 धावा. (कॉन्टन डीकॉक 26, इशान किशन नाबाद 72, सूर्यकुमार यादव नाबाद 12, अनरिच नोर्जे 1-25).





