Delhi News : दिल्लीत बहुमजली इमारत कोसळली; ११ जणांचा मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली – ईशान्य दिल्लीतील शक्ती विहार भागात शनिवारी पहाटे एक बहुमजली निवासी इमारत कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण गंभीर जखमी झाले आहेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दुर्घटना दिल्लीतील न्यू मुस्तफाबादमध्ये घडली आहे. ढिगाऱ्याखाली 8 ते 10 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे.
येथील शक्ती विहारमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची घटना पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. ही इमारत २० वर्षे जुनी होती. याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली.
विभागीय अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल यांनी सांगितले की, आम्हाला मध्यरात्री तीन वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा संपूर्ण इमारत कोसळल्याचे चित्र समोर होते आणि ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची माहिती मिळाली.
एनडीआरएफ, दिल्ली अग्निशमन सेवा लोकांना वाचवण्याचे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले. हे बचाव कार्य सुमारे १२ तासांहून अधिक काळ चालले. यात ११ जणांचे मृत देह बाहेर करण्यात यश आले आहे. तसेच ११ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही इमारत एका नवीन दुकानात सुरू असलेल्या बांधकामामुळे कोसळली असल्याची माहिती समजते. दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले.





