Mulshi Rain Update: दुबार पेरणीचे संकट टळले! मुळशीत मान्सूनचे दमदार आगमन; भात उत्पादकांना दिलासा
Mulshi Rain Update: मुठा आणि वळकी नद्या कोरड्या पडल्यानंतर मुळशीत वरुणराजाची हजेरी; धरणांमधील पाणीसाठा वाढण्याची आशा, खरीप हंगामाला मोठा आधार.

Mulshi Rain Update – गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुळशी तालुक्यात अखेर मान्सून पावसाचे आगमन झाले असून, सर्वदूर झालेल्या पावसामुळे भात उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोमवारी दुपारनंतर तालुक्यात विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. तब्बल 15 ते 20 दिवस उशिराने पावसाचे आगमन झाले असले तरी त्याने शेतकर्यांच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या आहेत.
यंदा मान्सून लांबल्यामुळे मुळशी तालुक्यातील शेतकरी चिंतेत होता. गेल्या अनेक वर्षांनंतर इतका उशिरा पाऊस सुरू झाल्याने तालुक्यातील बहुतांश धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला होता. काही धरणांनी तर तळ गाठल्याचे चित्र दिसत होते. मुठा आणि वळकीसारख्या नद्या कोरड्या पडल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली होती. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
दरवर्षीप्रमाणे नदीकाठच्या शेतकर्यांनी धरणातील पाणी आणि लवकरच पाऊस सुरू होईल या अपेक्षेने भात पेरणी केली होती. काही ठिकाणी रोपे उगवूनही आली होती. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने ही रोपे करपण्याची भीती निर्माण झाली होती. दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्गात मोठी चिंता होती. अशा परिस्थितीत सोमवारी दुपारनंतर मुळशी तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत भिजपाऊस सुरू राहिल्याने शेतकर्यांच्या चेहर्यावर समाधान दिसून आले.
पावसामुळे शेतातील पिकांना जीवदान मिळाले असून भात लागवडीच्या कामांनाही वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकर्यांच्या मते, हा पाऊस वेळेवर झाला नसला तरी सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. पुढील काही दिवस नियमित पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा आधार मिळणार असून भात उत्पादनाच्या आशाही वाढणार आहेत. उशिराने का होईना मान्सून दाखल झाल्याने मुळशीतील शेतकरी, ग्रामस्थ आणि पाणीटंचाईचा सामना करणार्या नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.



