मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंहला रिजेक्ट करण्यामागचं सांगितलं कारण; म्हणाले “शक्तिमान म्हणून…”

Mukesh Khanna | ‘शक्तिमान’ फेम अभिनेता मुकेश खन्ना त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मागील काही दिवसांपासून ‘शक्तिमान’ या गाजलेल्या मालिकेवर आधारित सिनेमा बनवत असल्याची चर्चा होती. तसेच यात मुख्य भूमिकेत अभिनेता रणवीर सिंह दिसणार असल्याचेही वृत्त समोर आले होते.
मात्र या भूमिकेसाठी रणवीरची निवड झाली नसल्याचे सांगितले आहे. इतकचं काय तर रणवीर सिंह, अक्षय कुमार किंवा आमिर खान यांच्यापैकी कोणाकडेही शक्तिमान साकारण्यासाठी लागणारा निरागसपणा आणि प्रामाणिकपणा नाही असं त्यांनी सांगितलं.
एका मुलाखतीमध्ये ते म्हणाले की, “रणवीर सिंहने त्याला शक्तिमानची भूमिका साकारण्याची संधी मिळावी यासाठी त्याने माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. हे खरं आहे की मी रणवीरचं त्याच्या अभिनयासाठी कौतुक केलं आणि त्याला टॅलेंटेड कलाकार म्हटलं. पण शक्तिमान म्हणून मी त्याची निवड केली नाही.”
पुढे ते म्हणाले, “मी याबाबत एक व्हिडीओसुद्धा अपलोड केला होता ज्यामध्ये मी स्पष्ट केलं की, रणवीरला या भूमिकेसाठी मी निवडलं नाही. तो तीन तास माझ्यासमोर बसला होता. पण अखेर मला त्याला सांगावं लागलं कि, या भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या भावनाचं त्याच्या चेहऱ्यावर नाहीत.” दरम्यान, रणवीरने केलेल्या न्यूड फोटोशूटवर देखील त्यांनी टीका केली होती.





