मुकेश अंबानी कतार दौऱ्यावर; डोनाल्ड ट्रम्प यांच्या भोजन समारंभात होणार सहभागी

नवी दिल्ली – रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी बुधवारी कतारची राजधानी दोहा कडे रवाना झाले. यावेळी ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. जानेवारी महिन्यामध्ये ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यावेळी अंबानी यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. आता पुन्हा ते ट्रम्प यांना भेटणार आहेत.
कतार सरकारने ट्रम्प यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या भोजन समारंभाला अंबानी उपस्थित राहणार असल्याचे सूत्राचा हवाला देऊन काही वृत्त संस्थांनी सांगितले आहे. यासंदर्भात समुहाने कसलीही प्रतिक्रिया जारी केलेली नाही. रिलायन्स उद्योग समूहाचे आणि कतारमधील कंपन्यांचे चांगले संबंध आहेत. कतार मधील गुंतवणूकदारांनी अंबानी यांच्या रिटेल कंपनीत एक अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या उद्योगांचा आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा थेट संबंध नसला तरी ट्रम्प यांच्या निर्णयाचा अप्रत्यक्ष परिणाम रिलायन्स उद्योग समूहाबरोबरच मोठ्या कंपन्यावर होत असतो. गेल्या वर्षी रिलायन्स उद्योग समूहाला व्हेनेझुएलातून खनिज तेल आयात करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र नंतर ट्रम्प यांनी या तेलावर 25% शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही खरेदी थांबलेली आहे. रिलायन्स उद्योग समूह खनिज तेलाचे आयात करून शुद्धीकरण केलेले तेल अमेरिकेला पाठवत आहे. त्याचबरोबर रिलायन्स उद्योग समूहातील डिजिटल उद्योगात अमेरिकेतील गुगल आणि मेटा या उद्योग समूहाने बरेच गुंतवणूक केलेली आहे.
कौटुंबीक संबंध
डोनाल्ड ट्रम्प आणि मुकेश अंबानी यांचे कौटुंबिक संबंध आहेत. मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या विवाहला डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या युवान्का उपस्थित होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला फेब्रुवारी 2020 मध्ये भेट दिली होती. त्यावेळी ट्रम्प आणि मुकेश अंबानी यांची भेट झाली होती.





