Muhammad Yunus : बांगलादेशातल्या आगामी निवडणुका फेब्रुवारीमध्ये; जुलै उठावाच्या वर्षपुर्तीनिमित्त डॉ. युनूस यांची घोषणा

ढाका : बांगलादेशात पुढील सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी महिन्यात घेतल्या जातील, अस देशाचे मुख्य सल्लागार डॉ. मुहम्मद युनूस यांनी काल जाहीर केले. गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वर्षपुर्तीनिमित्त राजधानी ढाका येथे एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती. जुलै उठावाची वर्षपुर्तीनिमित्त डॉ. युनूस यांनी टिव्हीवरून देशवासियांना संबोधित केले आणि निवडणुकांच्या नियोजनाबाबतची घोषणा केली.
हंगामी सरकारच्यावतीने आपण मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवणार असून आगामी सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवार २०२६ मध्ये रमजान महिन्यापुर्वी घेण्याची विनंती करणार आहे, असे ते युनूस म्हणाले. पुढील वर्षी रमजानचा महिना १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. चंद्राचे द’शन होण्यावर रमजानचा महिना कधीपासून सुरू होणार हे अवलंबून आहे. त्यापुर्वी म्हणजे जानेवारीच्या उत्तरार्धात किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पुर्वार्धात निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. बांगलादेशातील निवडणुका पुढील वर्षी एप्रिल महिन्याच्या पुर्वार्धात घेण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले होते.
आनंद आणि उत्सव, शांतता आणि सुव्यवस्था, मतदारांचा सहभाग आणि सौहार्द आणि प्रामाणिकपणा या सर्व विषयांबाबतीत देशातील आगामी निवडणुका संस्मरणीय व्हाव्यात असे आम्हाला वाटते आहे, असेही युनूस म्हणाले. आगामी निवडणुका मुक्त, पारदर्शी आणि उत्सवाच्या वातावरणात पार पडण्यासाठी शक्य असले ती सर्व मदत करायला आपण तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकांची पुर्वतयारी म्हणून आपले सरकार मानसिक आणि संस्थात्मक सज्जता साध्य करायला उद्यापासून सुरूवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारने शेख हसीना यांच्या आवामी लीग पक्षाची सर्व यंत्रणा मोडीत काढली असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे माजी पंतप्रधान खालेदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला आपले स्थान मजबूत करण्यास वाव मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या संघटनेनेही नॅशनल पीपल्स पार्टी नावाने आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. पक्षाने जमात-ए-इस्लामी आणि अन्य छोट्या पक्षांबरोबर मिळून बीएनपीविरोधात आघाडी केली आहे.





