कुलभूषण जाधव यांना पकडण्यास पाकला मदत करणाऱ्या ISI एजेंटची हत्या, अज्ञातांनी घातल्या गोळ्या

Mufti Shah Mir | माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात पाकिस्तानच्या आयएसआयला मदत करणाऱ्या मुफ्ती शाह मीरची हत्या करण्यात आली आहे. भारतीय नागरिक असलेले कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यांचे इराणमधून अपहरण करण्यात मुफ्ती शाह मीर याने पाकिस्तानच्या आयएसआयला मदत केली होती. आता बलुचिस्तानमध्ये त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
मुफ्ती शाह मीरची बलुचिस्तानमधील तुर्बत येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तो मानवी तस्करीत सहभागी असल्याचे मानले जाते. नमाजानंतर स्थानिक मशिदीतून बाहेर पडत असताना दुचाकीस्वार हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मीरला मृत घोषित केले.
मीर हा जमियत उलेमा-ए-इस्लाम नावाच्या इस्लामिक कट्टरपंथी राजकीय पक्षाचा सदस्य होता. मीरला आयएसआयने मारले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, तो मागील अनेक वर्षांपासून बलुच प्रदेशात पाकिस्तानी सैन्याला गुप्तचर माहिती पुरवण्याचे काम करत होता.
रिपोर्टनुसार, शाह मीरने आयएसआयसाठी अनेक मोठी कामे केली आणि अनेक बलुच तरुणांच्या अपहरण आणि हत्येत महत्त्वाची भूमिका बजावली. बलुचिस्तानमध्ये धार्मिक अतिरेकीपणा पसरवण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती.
मार्च 2016 मध्ये पाकिस्तानी सैन्याने निवृत्त भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. कुलभूषण हे भारतीय गुप्तचर संस्था रॉ चे कर्मचारी आहेत व त्यांना हेरगिरी करताना पकडण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातो. मात्र, भारताने त्यांना बलुचिस्तानमधून नाही तर इराणमधून अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे.
कुलभूषण जाधव यांचे इराण-पाकिस्तान सीमेवरून जैश अल-अदलच्या मुल्ला उमर इराणी यांच्या नेतृत्वाखालील गटाने अपहरण केले होते. त्यानंतर मीरसह अनेक मध्यस्थांमार्फत त्यांना पाकिस्तानी लष्कराच्या स्वाधीन केले. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याच भागात आयएसआयने उमर इराणी आणि त्याच्या दोन मुलांची कथितपणे हत्या केली होती. आता आयएसआयकडून मीरची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.





