पिंपरी | चिखली, मोशीत दूषित पाणीपुरवठा

चिखली, (वार्ताहर) – मागील महिन्यापासून चिखली व मोशी परिसरातील बहुतांश भागामध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते महापालिकेच्या संबंधित विभागाला वारंवार तक्रार करत आहेत. परंतु महापालिका प्रशासन यावर कायमस्वरुपी उपाययोजना करताना दिसून येत आहे. दूषित पाणीपुरवठ्याने नगारिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
मोशी परिसरातील गावठाण, विविध सोसायट्या, वाड्या-वस्त्यांना महापालिकेकडून पिण्याचे अशुद्ध पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. पिवळसर रंग व बेचव पाणी अनेक दिवसांपासून येत असून त्या पाण्याला दुर्गंधी देखील येत आहे. यामुळेच, तेथील नागरिकांना घशाचे आजार होऊ लागले आहेत. तसेच जुलाब, पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे.
चिखली, मोशी परिसरात सर्वसामान्य नागरिक वास्तव्यास आहेत. बहुतांश कामगार वर्ग येथे भाड्याने खोली करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्याकडे घरात वॉटर फिल्टर/ प्युरिफायर नाहीत. त्यामुळे दुर्गंधीयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांना शारीरिक आजारांना सामोरे जावे लागत आहे.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना नाईलाजस्तव बाटली बंद पाणी विकत घ्यावे लागत आहे. महापालिका अधिकारी तांत्रिक कारणे देऊन वेळ मारून नेत आहेत. मात्र, दुसरीकडे दवाखान्याचा आणि पाणी विकत घेण्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे.
प्रशासकीय अधिकारी हे पाणी पिणार का?
चिखलीमधील मोरेवस्ती, पाटीलनगर, रामदासनगर तसेच मोशी परिसरात दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. याबाबत अधिकार्यांना विचारले असता ड्रेनेजलाइन लिकेज असेल. किंवा रस्त्याचे काम करताना पिण्याची पाइपलाइन फुटली असेल यामुळे अशी समस्या निर्माण झाली असेल अशी उत्तरे दिली जात आहेत. परंतु हे दूषित पाणी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी पितील का असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
चिखली येथील रामदासनगर, गणेशनगर, सोनवणेवस्ती आणि पाटीलनगर परिसरात मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच पुरेसा आणि शुद्ध पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. – जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते, चिखली.





