पिंपरी | कामशेत-पवनानगर रस्त्यावर चिखल

कान्हे (वार्ताहर) – कामशेत पवनानगर रोडच्या कडेला चालू असलेल्या ड्रेनेजलाइनचे काम सुरु आहे. या कामासाठी खोदकाम करण्यात आले असून सर्व माती रस्त्यावर टाकण्यात आल्याने संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे दुचाकी घसरुन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे तसेच वाहनांमुळे चिखल उडत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काम चालू असलेले कोणतेही निर्देशक फलक लावलेली नाही कोणतेही प्रकारची साइड पट्टी लावलेली नाही. रोजरोसपणे रोडवर चिखल टाकला जात आहे. पावसाळ्यापूर्वी सुरू झालेले काम तात्काळ पूर्ण व्हायला हवे होते. मात्र संथ गतीने हे काम चालू असल्यामुळे याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कामशेत पवनानगर रोडवर चालू असलेल्या गटारीच्या कामामुळे तो चिखल रोडवर आल्याने दुचाकी स्वार स्लीप होऊन अपघात होण्याची शक्यताआहे. तसेच हा चिखल हा संपूर्ण रोडवर असल्याने रस्ता अरुंद होऊन समोरून येणाऱ्या गाडी चालकाला ही गाडी चिखल्यावरून घालावी लागते.
कित्येक वेळा त्या चिखलामध्ये मोठाले दगड असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते. पवन मावळमध्ये पर्यटकांची संख्या अधिक असते तसेच कामशेत ही मुख्य बाजारपेठ ओळखली जाते. त्यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते तरी प्रशासनाने व ठेकेदाराने हा चिखल तात्काळ दूर करावा, नागरिकांकडून मागणी होत आहे.





