MSRTC Ticket Hike : एसटी प्रवास महागला! स्वच्छतेसाठी द्यावे लागणार जास्तीचे पैसे; १५ एप्रिलपासून नवे दर
MSRTC Ticket Hike : एसटी महामंडळाने बस आणि स्थानकांच्या स्वच्छतेसाठी तिकीटावर अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.

MSRTC Ticket Hike – एसटी बस, बसस्थानक आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या खर्चाचा भार आता थेट प्रवाशांच्या खांद्यावर टाकण्यात आला आहे. एसटी महामंडळाने प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ वसूल करण्याचा निर्णय घेतला असून, १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार असून, महामंडळाच्या गंगाजळीत दररोज सुमारे १ कोटी १० लाख रुपयांची भर पडणार आहे. मात्र, स्वच्छतेच्या नावाखाली करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. एसटीच्या गाड्या आणि स्थानकांवरील स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच तक्रारी असतात.
धुळीने माखलेल्या जागा, रंगलेले कोपरे आणि मुतारीची दुर्गंधी हे चित्र बदलण्यासाठी महामंडळाने स्वतःच्या उत्पन्नातून तरतूद करण्याऐवजी सर्वसामान्य प्रवाशांवर हा भुर्दड टाकला आहे. महामंडळाच्या या भूमिकेवर प्रवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, पैसे देऊनही स्वच्छतेची हमी मिळणार का, असा सवाल विचारला जात आहे.
“वेळेवर बस येत नाहीत. एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी नारायणगावला किंवा जुन्नरला जावे लागते. बेल्हे, ओतूर, आळेफाटा येथे कार्ड सेंटर चालू करावे. १५ एप्रिलपासून होणारी दरवाढ स्वच्छतेच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारी आहे.”
– शिवाजी डुंबरे, प्रवाशी, बेल्हे





